बेनीबुद्रुक (लांजा) येथे घरात घुसून बिबट्याचा हल्ला; दोघे जखमी, परिसरात भीतीचे वातावरण.


लांजा तालुक्यातील बेनीबुद्रुक गावातील कुसुममळेवाडी येथे बुधवारी (३ जून) रात्री बिबट्याने घरात घुसून केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या घराच्या मागील बाजूने घरात शिरला. घरात असलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीवर त्याने अचानक झडप घालत हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे संबंधित व्यक्तीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले.
दरम्यान, मदतीसाठी आलेल्या १९ वर्षीय युवकावरही बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला. ग्रामस्थांनी धाडस दाखवत बिबट्याला हुसकावून लावले. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर बेनीबुद्रुक परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांना रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button