दापोली न्यायालयाने चेक अनादर प्रकरणी चार महिन्यांची शिक्षा व २१ लाख रुपये नुकसान भरपाई


भागीदारी पत्राच्या अनुषंगाने झालेल्या आर्थिक व्यवहारातून उदभवलेल्या चेक अनादर (कलम १३८, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट) प्रकरणात दापोली न्यायालयाने आरोपींना चार महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून फिर्यादीस २१ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
सदर प्रकरणात भागीदारी व्यवसायाशी संबंधित व्यवहारांमधून दोन स्वतंत्र चेक अनादराचे खटले दापोली न्यायालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद, साक्षीपुरावे आणि कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर आरोपींविरूध्द दोष सिध्द झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, आरोपींना चार महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच फिर्यादीला एकूण २१ लाख रुपये नुकसानभरपाई अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, ही नुकसानभरपाई निर्धारित कालावधीत अदा करणे बंधनकारक राहील. याशिवाय, न्यायालयाने नुकसानभरपाईची रक्कम चार महिन्यांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
जर आरोपींनी न्यायालयाच्या आदेशानुसार निर्धारित मुदतीत नुकसान भरपाई अदा केली नाही, तर त्यांना अतिरिक्त २० दिवसांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. चेक अनादरासारख्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने दिलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वासार्हता आणि कायदेशीर जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ऍड. विद्याभूषण वैद्य यांनी काम पाहिले. त्यांच्या प्रभावी युक्तीवादामुळे आणि सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने फिर्यादीच्या बाजूने निकाल दिल्याची माहिती मिळाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button