
विल्ये बौद्धजन विकास कमिटीच्या वतीने देहदान व अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात
रत्नागिरी : तालुक्यातील विल्ये बौद्धजन विकास कमिटी यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती तसेच माता रमाई यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त देहदान व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक प्रबोधनाची परंपरा जपत समितीच्या वतीने दरवर्षी विविध जनहिताचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून या महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक रेशम विजय जाधव यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उपस्थितांना देहदान, अवयवदान व नेत्रदानाचे महत्त्व, त्यासाठीची प्रक्रिया, तसेच इच्छुकांनी संकल्पपत्र कसे भरावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी देहदान व नेत्रदान विषयक माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे विल्ये बौद्धजन विकास कमिटीचे सदस्य आयु. छाया सीताराम कांबळे व आयु. सिताराम भागा कांबळे यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी शरीरावर अभ्यास करता यावा व भविष्यात कुशल डॉक्टर घडावेत या उदात्त हेतूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे देहदान संकल्पपत्र भरले. त्यांच्या या प्रेरणादायी निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत व कौतुक केले.
याप्रसंगी विल्ये बौद्धजन विकास कमिटीच्या वतीने आयु. छाया कांबळे व आयु. सीताराम कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. जनार्दन गंगाराम कांबळे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश कांबळे, राकेश कांबळे आणि समितीच्या सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.
देहदान व अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून समाजातील अधिकाधिक नागरिकांनी याबाबत जागरूक होऊन पुढाकार घ्यावा. देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाची संधी मिळते, तर अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे समाजाने या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.




