जनआक्रोश समितीने खारपाडा टोलनाका बंद केला आक्रमक मागणी ; आधी कामे पूर्ण करण्याची मागणी केली


(खारपाडा प्रतिनिधी:- गणेश नवगरे )

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा येथे सुरू करण्यात आलेल्या टोलवसुलीच्या विरोधात जनआक्रोश समितीच्या नेतृत्वाखाली सात दिवसाच्या आंदोलनानंतर रविवारी 31मे2026 रोजी तीव्र आंदोलन केले. महामार्गावरील अनेक कामे अपूर्ण असताना टोलवसुली सुरू केल्याबद्दल संतप्त झालेल्या आंदोलकांनी काही काळ दोन्ही बाजूंचे टोलनाके बंद करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात स्थानिक नागरिक, वाहनचालक, विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या वेळी जनआक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गावरील अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप केला. सेवा रस्ते (बायपास), महामार्गवरील पुलांची कामे अपूर्ण. नको असलेले गतिरोधक रस्त्यालगतची सुरक्षा व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा तसेच रस्त्यावरील प्रकाशयोजना अद्याप पूर्ण झालेली नसताना टोलवसुली सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम महामार्गाचे सर्व काम पूर्ण करा आणि त्यानंतरच टोल आकारणी सुरू करा, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनानंतर प्रशासन आणि आंदोलक यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर १ जूनला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयात आंदोलक प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादव यांनी सांगितले, की नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. आवश्यक असल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच न्यायालयात रिट याचिका दाखल करून कायदेशीर लढाही उभारण्यात येईल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने MH-०६ आणि MH-४६ या वाहन क्रमांकांना टोलमाफी दिल्याचे आदेश आजपर्यंत जारी केलेले नाहीत. काही राजकीय नेत्यांकडून याबाबत गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे कोकणवासीयांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
यावेळी जनक्रोश समितीचे सचिव रुपेश दर्गे सुरेंद्र पवार विशाखा खेडेकर.अनिकेत मेस्त्री. आदी कोकणकर मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button