रोज ताजे जेवण आता घरपोच; रत्नागिरीत ‘टिफिनिफाय’ ॲपची सेवा सुरू


रत्नागिरी शहरातील नोकरदार, विद्यार्थी, पीजीमध्ये राहणारे युवक-युवती तसेच व्यस्त कुटुंबांसाठी ‘टिफिनिफाय’ हे नवे ॲप उपयुक्त ठरणार आहे. घरगुती चवीचे, ताजे आणि स्वच्छ जेवण थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याची सुविधा या ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असून सोमवारपासून रत्नागिरी शहरात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातील अथर्व बळवंत सुतार या युवा उद्योजकाने ही संकल्पना विकसित केली आहे. दैनंदिन धावपळीत स्वयंपाकासाठी वेळ न मिळणाऱ्या नागरिकांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘टिफिनिफाय’ची निर्मिती करण्यात आली आहे.

या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना विविध हॉटेल्स आणि किचनमधील रोजचा नवीन मेनू निवडण्याची सुविधा मिळणार आहे. दुपारचे आणि रात्रीचे जेवण स्वतंत्रपणे निवडण्याची सुविधाही उपलब्ध असल्याने ग्राहकांना आपल्या गरजेनुसार पर्याय निवडता येणार आहेत.

‘टिफिनिफाय’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साप्ताहिक मेनू नियोजन. ग्राहकांना संपूर्ण आठवड्याचा मेनू आगाऊ पाहता येत असल्याने जेवणाचे नियोजन अधिक सुलभ होते. तसेच विविध बजेटनुसार परवडणारे सबस्क्रिप्शन प्लॅन्स उपलब्ध करून देण्यात आले असून दीर्घकालीन योजनेतून ग्राहकांचा खर्च कमी होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.

अथर्व सुतार यांनी रत्नागिरीतील फिनोलेक्स अकॅडमी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये एआय आणि एमएल विषयासह पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ते जानशी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बळवंत सुतार यांचे चिरंजीव तसेच राजापूरातील ज्येष्ठ विधिज्ञ शशिकांत सुतार यांचे पुतणे आहेत.

ताजे, चविष्ट आणि नियोजित जेवण घरपोच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, स्थानिक स्तरावरील युवा उद्योजकतेचे हे एक उल्लेखनीय उदाहरण मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button