
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
रत्नागिरी : हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या व युवासेनेच्या (ग्रामीण व मुंबई कार्यकारणी) वतीने रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत १३ जून रोजी सकाळी १० वाजता मराठा भवन, देवरुख (ता. संगमेश्वर) येथे होणार आहे.
या कार्यक्रमात रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण तालुक्यातील दहावीमध्ये तालुक्यात प्रथम तीन विद्यार्थी व बारावीमधील आर्टस्, कॉमर्स, सायन्स या शाखेतून तालुक्यातील प्रथम तीन आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसहकार सेना, रिक्षासेना व अंगीकृत सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन , दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे संपर्कप्रमुख सुरेश कदम, जिल्हा महिला संघटक सौ. वेदा फडके, जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी केले आहे.




