ग्रामस्थांच्या गांधीगिरीला यश; तळवट गावात अखेर टँकरने पाणीपुरवठा सुरू


पाणीटंचाईच्या तीव्र समस्येने त्रस्त झालेल्या तळवट पुनर्वसन गावातील ग्रामस्थांच्या गांधीगिरी आंदोलनाला अखेर यश आले असून प्रशासनाने तातडीने दखल घेत गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. गावात टँकरच्या माध्यमातून पाणी पोहोचू लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
धरण दुरुस्तीच्या कामामुळे तळवट पुनर्वसन गावात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत होती. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांनी चिपळूण येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जाऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले.
कार्यालयातील कुलरमधील पाणी संपवत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आणि पाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या गांधीगिरी आंदोलनाची तालुकाभर चर्चा रंगली होती. आंदोलनानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत तातडीची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करत गुरुवारपासून गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, तात्पुरत्या स्वरूपात टँकर सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित विभागाने दीर्घकालीन नियोजन करावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button