अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जनतेच्या मनात जे आहे तेच होईल.– उदय सामंत


कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना या विषयावर महेंद्र दळवी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले की, “महेंद्र दळवी यांच्या मुलीने नेमक्या कोणत्या उद्देशाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर महेंद्र दळवी हे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील. त्या चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.”

कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सामंत यांनी स्थानिकांच्या भावनांचा आदर केला जाईल, असे स्पष्ट केले. “अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जनतेच्या मनात जे आहे तेच होईल. स्थानिक लोकांच्या विरोधात कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन पुढील भूमिका निश्चित केली जाईल,” असे ते म्हणाले.

दापोली तालुक्यातील गोपाळगड किल्ल्यावरील वादाच्या पार्श्वभूमीवरही उदय सामंत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. “गोपाळगड किल्ल्याच्या संदर्भात २५ तारखेनंतर निर्णय घेतला जाईल. किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याबाबत विचार सुरू असून यासंदर्भात शासन स्तरावर अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी सांगितले.

कोकण विधान परिषद निवडणूक, मराठा आरक्षण, अणुऊर्जा प्रकल्प आणि गोपाळगड किल्ला या चारही महत्त्वाच्या विषयांवर उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः जुईली दळवी यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय काय होणार, याकडे कोकणातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button