रविवारची सुरुवात पावसाने; मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये दमदार हजेरी, मान्सूनचे आगमन लवकरच!


मुंबईमध्ये पुन्हा उष्णतेमुळे लाही लाही होत असून, अधूनमधून आभाळ ढगाळ होत आहे. मात्र तरीही पावसाचे चिन्ह नसल्याने, मुंबईकर आभाळाकडे डोळे लावून बसले होते त्यांना दिलासा मिळाला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने आज, रविवारी सकाळी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला आहे, तर दुपारनंतर हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. सकाळी अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला.
पहाटे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईकरांची रविवारची सकाळ दिलासादायक झाली असून तापमानात घट नोंदली गेली आहे. जुहू, वांद्रे, अंधेरी पश्चिम परिसरात पहाटे 5.45 दरम्यान पाऊस झाला. नवी मुंबईतील तळोजा परिसरातही सकाळी सातच्या सुमारस पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शिवाय रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये सकाळी 7-7.30च्या सुमारस पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या चारही जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला आहे, तर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचीही अपेक्षा आहे. दक्षिण कोकणामध्ये मान्सूनपूर्व सरी अनुभवल्याने आता किमान उन्हाचा ताप कमी होण्यासाठी पावसाची उपस्थिती गरजेची आहे, अशा प्रतिक्रिया मुंबईकरांमध्ये उमटत आहेत. शनिवारी दिलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यामध्ये सोमवार ते बुधवार या काळात ‘यलो ॲलर्ट’ दिला असून या काळात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसासाठी ‘यलो ॲलर्ट’ कायम आहे. मुंबईमध्ये सोमवारी हलक्या सरी, तर मंगळवारी पुन्हा मेघगर्जनेसह पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी येथे बुधवारपर्यंत ‘यलो ॲलर्ट’ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर येथे बुधवारपर्यंत, जळगावात मंगळवारपर्यंत, तर अहिल्यानगर, पुणे येथे सोमवार ते बुधवार या काळात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांनाही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे.
केरळला चार दिवसांत पोहोचणार मान्सून

मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले असून शनिवारी मान्सून वाऱ्यांनी अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरातही प्रगती केली. केरळमध्ये येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button