पुण्यातील मृत्यू तांडवानंतर ‘मिथेनॉल’चे घबाड हाती! रेक्स कंपनीचा साठा जप्त, गाळे सील; IAS तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई!


पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात अवघ्या ३० रुपयांत मिळणारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल १९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यू तांडवामुळे संपूर्ण राज्य हादरले असून अनेकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.

या दारूत ‘मिथेनॉल’ हे जीवघेणे विषारी रसायन मिसळल्याचे समोर येताच, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात मिथेनॉलचा अवैध साठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाने भिवंडीत धाड टाकून मिथेनॉलचा साठा जप्त केला आहे.

पोलीस तपासात पुण्याच्या विक्रेत्याने ज्या कंपनीकडून मिथेनॉल मिळवले होते, ती ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ कंपनी असल्याचे स्पष्ट झाले. या कंपनीचे कार्यालय वाशी येथे असून गोदाम भिवंडीतील अंजुर रोड, वळगाव येथील म्हात्रे कंपाउंडमधील गाळा नंबर ५४४/ए मध्ये असल्याची माहिती मिळताच, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ठाण्याचे औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांनी तात्काळ छापा टाकला.

या कारवाई दरम्यान गोदामात तब्बल ५,९२९ किलोग्रॅम मिथेनॉलचा साठा आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे, या विषारी द्रव्याची कोणतीही नोंदवही (स्टॉक रजिस्टर) किंवा खरेदी-विक्रीचा तपशील कंपनीकडे उपलब्ध नव्हता.

मालकाविरुद्ध गुन्हा दाखल, परवाना रद्द होणार

कारवाईच्या वेळी संस्थेचे मालक अरूणकुमार चौबे आणि सक्षम व्यक्ती अभिषेक चौबे हजर नव्हते. अधिक चौकशी केली असता, त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आधीच ताब्यात घेतल्याचे समजले. या दोघांविरुद्ध भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, विषारीद्रव्य अधिनियमांतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावून कंपनीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया ठाणे एफडीए कार्यालयाने सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फुगेवाडीत ज्यांनी प्राण गमावले त्यांनी कर्नालसिंग विरका याच्या घरी हातभट्टीची दारू पिली होती. विरकाने ही दारू योगेश वानखेडेकडून मिळवली होती, तर योगेश उरळी कांचन येथील राजू प्रजापतीकडून दारू आणून पुरवत होता. या संपूर्ण साखळीला मिथेनॉलचा पुरवठा भिवंडीच्या ‘रेक्स इंटरनॅशनल’ कंपनीकडून केला गेल्याचे उघड झाले आहे.

“जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही!

“अन्न व औषधांच्या बाबतीत बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या कोणत्याही संस्था वा व्यक्तीला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. औषधे व सौंदर्ये प्रसाधने कायदा, १९४० चे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट न्यायालयीन कारवाई केली जाईल.” – IAS तुकाराम मुंढे, आयुक्त (अन्न व औषध प्रशासन)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button