
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; पतंजलीच्या औषधांचा ७३ लाखांचा साठा जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, औषधे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत पतंजली समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधांवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, दिव्य फार्मसीच्या काही आयुर्वेदिक उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये विविध गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम आणि वैज्ञानिक पुराव्यांशिवाय केलेले दावे आढळून आले. या प्रकरणी सुमारे ७३ लाख २५ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांच्या तपासात कर्करोग, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांवर निश्चित उपचाराचा दावा करणाऱ्या जाहिराती आढळल्या. अशा प्रकारच्या जाहिराती ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या असल्याचा प्राथमिक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर जनतेच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला होता. त्यानुसार औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० चे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत एकूण ५३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या मोहिमेत भेसळीच्या विविध प्रकरणांमध्ये ३३ जणांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.




