हर्णै प्रकरणात सहा संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात


दापोली हर्णै येथील ऐतिहासिक गोवा किल्ला परिसरात दोन युवकांवर झालेल्या सामूहिक हल्ल्यामुळे बुधवार दि. 27 मे रोजी रात्री संपूर्ण दापोली तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
चिन्मय सुधीर गुरव (वय 23) व महेंद्र रघुवीर या दोन युवकांना लोखंडी शिगा, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत महेंद्र रघुवीर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व चिन्मय गुरव याला देखील दुखापत झाली असल्याने पुढील उपचारासाठी डेरवण येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिन्मय गुरव हा मर्दानी खेळ प्रशिक्षक असून तो नियमितपणे गोवा किल्ला परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात असतो. मंगळवार दि. 26 मे रोजी रात्री किल्ला परिसरात दोन युवक सिगारेट ओढत असून दंगा करत असल्याची माहिती किल्ल्याचे बांधकाम ठेकेदार नरेश मोहिते यांनी चिन्मय गुरव याला दिली. त्यावेळी चिन्मय गुरव व त्याचा मित्र महेंद्र रघुवीर यांनी या सिगारेट पिणाऱ्या मुलांना समज देताच त्यांनी या दोघांनाही शिवीगाळ करून पळ काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बंदर मोहल्ला मशिदीजवळ संबंधित युवकांनी भेटल्यानंतर माफी मागितल्याने प्रकरण मिटल्याचे समजले जात होते. तसेच सदरच्या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला होता. मात्र, कालचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर का टाकलास? असा जाब विचार बुधवार दि. 27 मे रोजी सायंकाळी पुन्हा वाद उफाळून आला.
चिन्मय गुरव याने दिलेल्या तक्रारीनुसार, झैन असलम हुनेरकर व मुफीज जावेद सोलकर यांनी अन्य 10 ते 15 युवकांसह गोवा किल्ल्याच्या बुरूजावर जाऊन चिन्मय गुरव व महेंद्र उर्फ भार्गव रघुवीर यांना शिवीगाष करत मारहाण केली. लोखंडी शिगेने वार करत दोघांना गंभीर जखमी केले. या मारहाणीत चिन्मय गुरव यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाची सोनसाखळी तुटून गहाळ झाल्याचीही तक्रार देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच हर्णै मधील शिवप्रेमींनी पोलिस दूरक्षेत्र गाठले तिथे जमाव जमला व त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असे सांगितले तसेच दापोलीतील शिवप्रेमी, युवक व नागरिक मोठया संख्येने केळसकर नाका येथे जमा झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हर्णै-दापोली मार्गावर बायपास रोडवर टायर पेटवून वाहतूक रोखण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटना कळताच दापोली पोलिस निरीक्षक महेश तोरसकर हे आपली पोलिस कुमक घेऊन ताबडतोब घटनास्थळी हजर झाले. जमाव प्रचंड असल्याने रात्री उशिरा जलद कृती दल, दंगलग्रस्त राखीव दल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, स्थानिक पोलिस कुमक तातडीने हर्णै येथील बायपास रोड येथे दाखल झाले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शेलेश सणस हे देखील उपस्थित होते. यांनी जमावाला समज देऊन पांगविले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधिक्षक बी.पी. महामुनी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणी झैन हुनेरकर (वय 22), मुफीज सोलकर (वय 23), सलाह कोंडविलकर (वय 19), नाबील काझी (वय 19) जैब जमादार (वय 20) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या सहा जणांना पोलिसांनी घेतल्याची खात्री झाल्यावर जमाव शांत झाला. दापोली पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून दापोली व हर्णै परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घडलेल्या प्रकरणासंदर्भात जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नितीन बगाटे तसेच अपर पोलिस अधिक्षक बी.पी. महामुनी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून संबंधित घटनेबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
सदरव्या ताब्यात घेण्यात आलेल्या सहाजणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे असे दापोली पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button