
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडूनअनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित?
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक मतदार, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर अनिकेत तटकरे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे समजते. आता त्यांच्या उमेदवारीची केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१ जून रोजी अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून दिली आहे. रायगड जिल्ह्याचे बहुप्रतीक्षित पालकमंत्री पद शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषद उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला महायुतीने स्वीकारल्याची जोरदार चर्चा आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंख्या पाहता महायुतीची बाजू भक्कम मानली जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार शिवसेनेकडे ३३४, भाजपकडे २६४ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६५ मतदार आहेत. शिवसेनेकडे सर्वाधिक मतदार असल्याने सुरुवातीला या जागेवर त्यांचा दावा मजबूत मानला जात होता. मात्र पालकमंत्री पद आणि विधान परिषद उमेदवारी यांचा समतोल साधत महायुतीने ‘पालकमंत्रीपद शिवसेनेला आणि विधान परिषद राष्ट्रवादीला’ असा मध्यममार्ग स्वीकारल्याचे बोलले जात आहे.




