अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज शुक्रवारी जाहीर होणार


मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर होत आहे. या पहिल्या फेरीसाठी २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध असून, त्यासाठी ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग २ भरला आहे. त्यामुळे पहिल्या नियमित फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील ९ हजार ५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी नियमित फेरीसाठी १७ लाख ४२ हजार ४२३ जागा आहेत. तर शून्य फेरीमध्ये कोटा प्रवेशातून ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने सध्या २१ लाख ५९ हजार ५३ जागा रिक्त आहेत. अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ४९ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग २ भरला आहे.

नियमित फेरी १ ची वाटप प्रक्रिया शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर केली जाणार असून, नियमित आणि कोटा फेरी १ साठीची प्रवेश प्रक्रिया २९ मे ते ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांना तेथे प्रवेश घेणे बंधनकारक राहणार आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास किंवा प्रवेश नाकारल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे.

मुंबई विभागात यंदाही सर्वाधिक नोंदणी झाली आहे. मुंबई विभागातून २ लाख ६९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी २ लाख १६ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. पुणे विभागात २ लाख ७ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील १ लाख ६८ हजार १३४ विद्यार्थी पहिल्या फेरीत सहभागी आहेत. नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर विभागांतही मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. लातूर विभागातून सर्वात कमी, म्हणजे ६४ हजार ५५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यांतर्गतही जागांसाठी अल्पसंख्याक कोट्यात ४२ हजारांहून अधिक अर्ज भरले असून, त्यापैकी केवळ मुंबई विभागातच १७ हजारांहून अधिक अर्ज आहेत. तर इनहाउस कोट्यात ४२ हजार ६३५ अर्ज भरण्यात आले आहेत.

विद्यार्थी आणि पालकांनी गुण आणि महाविद्यालयांच्या मागील वर्षांच्या कटऑफचा विचार करून पसंतीक्रम भरल्यास पहिल्याच यादीत मोठ्या प्रमाणावर प्रवेश मिळण्याची शक्यता शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button