
आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदमचे पुन्हा राज्यस्तरावर वर्चस्व; १५ वे विजेतेपद पटकावले
संगमेश्वर तालुक्यातील देवडे (साखरपा) येथील आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती आकांक्षा उदय कदम हिने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत दमदार कामगिरी करत तिने आपल्या कारकिर्दीतील १५ वे राज्यविजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन तसेच सिव्हिल फेडरेशन रोटरी क्लब ऑफ बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ मे २०२६ या कालावधीत बोरीवली येथील मंडपेश्वर सिव्हिल फेडरेशन (एमसीएफ) येथे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत राज्यातील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
आकांक्षा कदम हिने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. उपांत्य फेरीत मिताली पिंपळे हिच्यावर मात करत तिने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडीगांवकर हिच्याशी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत आकांक्षाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात सरस खेळ करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
विशेष म्हणजे, आकांक्षा कदम हिला गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तिच्या या यशामुळे कोकणच्या क्रीडाक्षेत्रात पुन्हा एकदा अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.




