कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता,मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार


एकीकडे विदर्भ वाढत्या उष्णतेने होरपळला असून दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज विदर्भातील ४, मराठवाड्यातील २ जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबईसह, पालघर आणि ठाण्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान या दुहेरी टोक गाठलेल्या हवामानाने नागरिकांची मात्र त्रेधा तिरपीट उडाली आहे. पुढील काही तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून काही दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यामुळे उकाड्याने लाही लाही झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.

आज विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे तापमानाने ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून नागपूरमध्ये ४६.५° तर भंडारा आणि गडचिरोली येथे ४६.४° तापमानाची नोंद झाली आहे. अकोला आणि नागपूर जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उष्ण लाटेचा प्रभाव कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ब्रह्मपुरी हे शहर देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले असून जागतिक स्तरावरही त्याची नोंद झाली आहे.दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवत आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. तर यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर; तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मान्सूनची वाटचालही वेगाने सुरू असून पुढील काही तासांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button