
बुडणाऱ्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या करण मिलके यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार
रत्नागिरी : समुद्रात कालव काढताना पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने जीव वाचविणाऱ्या करण मिलके यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी समुद्रात कालव काढताना एका महिलेचा पाय घसरून ती पाण्यात पडली होती. या घटनेनंतर लागलीच मिलके कुटुंबीयांनी तात्काळ या महिलेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका महिलेचा जीव वाचला होता. आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या जीव वाचवणाऱ्या करण मिलके यांच्या धाडसी व मानवतावादी कृतीबद्दल विशेष कौतुक करून पोलीस अधीक्षक श्री. बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. या वेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.




