
रत्नागिरी जिल्ह्यात एसटीला महिन्यास 25 लाख लिटर डिझेलची गरज
राज्यात डिझेलचे दर वाढल्याने एसटी प्रवास महागण्याचे संकेत परिवहनमंत्र्याने दिले आहे. मात्र तुर्तास भाडेवाढ होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.रत्नागिरीसह जिल्ह्यात इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. मात्र एसटी सेवेसाठी ऑइल
कंपन्यांकडून सध्या सुरळीत इंधन पुरवठा होत आहे. एसटीच्या रत्नागिरी विभागातील 9 आगारातील 650 हून अधिक बसेससाठी दररोज 85 हजार लिटर तर महिन्याला 25 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. एप्रिलमध्येही लाखो लिटरच्या डिझेलचा वापर झाला होता.
एसटीच्या रत्नागिरी विभागातील 9 आगारात दररोज 650 बसेस आहेत. त्यामध्ये दरदिवशी 600 हून अधिक वाहने रस्त्यांवर धावतात. एका एसटी बसेसचे सरासरी चार ते साडेचार ॲव्हरेज असते. प्रत्येक डेपोनिहाय पळणारी वाहने व त्यांच्या होणाऱ्या किलोमीटरनुसार डिझेल वापरले जाते. प्रत्येक आगाराच्या ठिकाणी 10 ते 20 हजार लिटरची एक टाकी आहे. रत्नागिरी, चिपळूणसह इतर आगाराला दररोज 10 हजार लिटर डिझेल लागते तर काही डेपोंना 7 किंवा 9 लिटर डिझेलची आवश्कता आहे. दरम्यान, दोनवेळा डिझेलचे दर वाढलेले आहे. त्यामुळे येत्या काळात एसटीची पुन्हा भाडेवाढ होण्याचे संकेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार एवढं मात्र निश्चित.




