
इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूळ गुणपत्रक आणि प्रमाणपत्र २५ मे रोजी मिळणार
कोकण विभागीय मंडळाची माहिती
रत्नागिरी दि. २४ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचे मूळ गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि इतर साहित्य सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार आहे। कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनिता गुरव यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता। त्यानंतर आता विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप : विभागीय मंडळाकडून सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार, २५ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र आणि शालेय अभिलेख यांचे वाटप केले जाईल.
विद्यार्थ्यांना वाटप : संबंधित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत त्याच दिवशी (२५ मे) दुपारी ३:०० वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रकांचे व प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल।
याबाबत कोकण विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




