
रत्नागिरीतील सूरज झोरे खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; जुन्या वादातून कोयत्याने ३१ वार
रत्नागिरी येथील साईनगर सात बंगल्यामागे घडलेल्या सूरज राजाराम झोरे खून प्रकरणात पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैयक्तिक वाद आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
गुरुवारी रात्री ९.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास सूरज झोरे याच्यावर कोयत्याने तब्बल ३१ वार करण्यात आले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शहर पोलिसांनी मुख्य संशयित सोहम एकनाथ म्हात्रे (१८, शांतीनगर-रसाळवाडी) याच्यासह अभिषेक राठोड (२२, आदिनाथ नगर) आणि नजिबूल शेख (२१, शांतीनगर-रसाळवाडी) यांना अटक केली आहे.
पोलिस तपासानुसार, मृत सूरज झोरे आणि मुख्य संशयित सोहम म्हात्रे हे पूर्वी मित्र होते. मात्र, सोहमच्या प्रेयसीबाबत सुरू असलेल्या वादातून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी एका पार्टीदरम्यान दोघांमध्ये वाद होऊन सूरजने सोहमला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सूरज कामानिमित्त रत्नागिरीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर सोहमने त्याला फोन करून साईनगर परिसरात बोलावून घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तेथे आल्यानंतर सोहमने बॅगेतून कोयता काढून त्याच्यावर सपासप वार केल्याचे सांगितले जात आहे.
खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सहायक सरकारी वकील निलंजन नाचणकर यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सर्व आरोपींना २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.




