
इंधन दरवाढ आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस आक्रमक; पंतप्रधान मोदींना विचारले चार प्रश्न!
Fuel Price Hike Congress Questions PM Modi On Inflation : केंद्र सरकारने शनिवारी पुन्हा एकदा (तिसऱ्यांदा) पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भारतातील सामान्य ग्राहकांचे महागाईपासून संरक्षण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच ऊर्जा धोरण आणि परराष्ट्र संबंध ज्या पद्धतीने केंद्र सरकार हाताळत आहे, त्यावरही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव गौडा आणि प्रवक्त्या डॉली शर्मा यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. इंधन दरवाढ करून महागाईला चालना देण्याऐवजी केंद्र नागरिकांना वाढत्या किमतींपासून वाचवणे हे सरकारचे नैतिक आणि आर्थिक कर्तव्य आहे. केंद्र सरकार आर्थिक आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, असे राजीव गौडा म्हणाले.
राजीव गौडा यांनी यावेळी मोदी सरकारला चार प्रश्न विचारले आहेत.
१) २०१४ पासून कच्च्या तेलाचे दर कमी असताना मोदी सरकारने त्याचा फायदा भारतीय ग्राहकांना का होऊ दिला नाही?
२) आपण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात विविधता का आणली नाही.
३) मोदी सरकार भारताच्या जनतेची फसवणूक का करत आहे?
४) वाढती महागाई, दरवाढ आणि मंदावलेली अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी सरकार काय करत आहे?
हर रोज सुबह जब हमारी आंखें खुलती हैं, तो नरेंद्र मोदी पेट्रोल-डीजल और रसोई गैस के दाम बढ़ाकर धमाका करते हैं।
कांग्रेस पार्टी ने हमेशा जनता को राहत देने का काम किया। जब कच्चे तेल की कीमत $140 प्रति बैरल थी, तो पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी की सरकार ने जनता को सब्सिडी दी।…
भारताला लागणाऱ्या इंधनापैकी जवळपास ८० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार आल्यानंतर आपल्याला भोगावे लागतात. त्यात केंद्र आणि राज्य सरकारांनी लादलेला कर आणि चलनातील चढ-उतार यामुळे किरकोळ इंधनाच्या किमतींवर अनेकदा परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही भाजपाप्रणीत सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले, असा आरोप विरोधी पक्षांनी केला.
भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड
गौडा यांनी केंद्र सरकारच्या ऊर्जा धोरणावर टीका केली. आंतरराष्ट्रीय तेल पुरवठादारांशी व्यवहार करताना भारताने आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड केल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पसंतीनुसार तेल आयात करण्याचा निर्णय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर भारताने इराणकडून होणारी कच्च्या तेलाची आयात लक्षणीयरित्या कमी केल्याचा उल्लेख केला. तसेच रशियाकडून ज्या पद्धतीने आयात केली जाते, त्या धोरणावरही टीका केली. भारत आपल्या ऊर्जाविषयक हितांचा स्वतंत्रपणे विचार करण्याऐवजी परवानगी मागत आहे, असाही आरोप गौडा यांनी केला.
राजीव गौडा यांनी तिसऱ्या प्रश्नात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेची स्थिती आणि महागाईबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. ‘सर्व काही चांगले चालले आहे, असे सांगून तुम्ही भारतातील जनतेची सातत्याने फसवणूक केली. त्यांनी मतदान करताच तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आहात’, असा आरोप गौडा यांनी केला.
समस्या सोडवण्यासाठी काय करणार?
वाढती महागाई आणि ढासळलेली अर्थव्यवस्था ठीक करण्यासाठी आताच्या आता पावले उचला, असे आवाहनही गौडा यांनी चौथ्या प्रश्नाच्या माध्यमातून केले आहे. ‘वाढत्या इंधन दरामुळे महागाईच्या परिणामापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना राबवायला हव्यात. चलनवाढ, महागाई आणि अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती रोखण्यासाठी सरकार काय करत आहे?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हा सगळा दोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्यांनीच यात काहीतरी करणे गरजेचे असून ही समस्या आताच्या आता सोडवावी लागेल, असेही ते म्हणाले.
देश की सच्चाई है कि 👇
- दूध की कीमतें 3% बढ़ गई हैं
- आटा की कीमतें 12.50% तक बढ़ गई हैं
- चावल की कीमतें 12.5% तक बढ़ गई हैं
- तुअर दाल की कीमतें 15% तक बढ़ गई हैं
- सब्ज़ियों की कीमतें 10 से 25% तक बढ़ गई हैं
- खाने में इस्तेमाल होने वाले तेल की कीमतों में 12% की वृद्धि… pic.twitter.com/7oUxcw6Ygr
— Congress (@INCIndia) May 23, 2026
महागाईचा तक्ता
प्रवक्त्या डॉली शर्मा यांनी देशात उसळलेल्या महागाईची यादीच दिली. दूध, धान्याचे पीठ, तांदूळ, तूरडाळ, भाज्या आणि खाद्य तेल यांच्यात किती टक्के दर वाढ झाली आहे, याची माहिती त्यांनी दिली. देशात भीषण महागाईने टोक गाठलेले असताना सरकार फक्त पीआर करण्यात व्यस्त आहे, असाही आरोप त्यांनी केला.
मोदी सरकार आणि त्यांचे नेते केवळ दुसऱ्या देशांचे उदाहरण देऊन बाता मारतात. पण भारतात महागाई कमी का होत नाही, याबद्दल ते काहीही बोलत नाहीत. सामान्य माणसाला रोजचे जगणे अवघड झाले आहे. देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. टॅक्सी, ऑटो चालक संपावर गेले आहेत. लोकांना कर्ज काढून घर चालवावे लागत आहे, त्यामुळे त्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे, अशी परिस्थिती डॉली शर्मा यांनी मांडली.
डॉली शर्मा पुढे म्हणाल्या, नीट पेपरफुटीनंतर एका गरीब कुटुंबातील मुलाने आत्महत्या केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्या मुलाच्या कुटुंबीयांशी संवाद साधला, तेव्हा समजले की, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी ११ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. ही सर्व परिस्थिती पाहता हेच का ते अच्छे दिन? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यावे.




