रत्नागिरी शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह


रत्नागिरी शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ९० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचे सांगितले असतानाच नगराध्यक्षांच्या प्रत्यक्ष पाहणीत अनेक ठिकाणी नाले तुंबलेल्या अवस्थेत आढळून आले.
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, आरोग्य सभापती नागवेकर तसेच बांधकाम समिती सभापती बंटी किर यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली. प्रमोद महाजन क्रीडासंकुल परिसर, पेठकिल्ला आणि इतर भागांतील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक आणि घाण साचल्याचे निदर्शनास आले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नगराध्यक्षांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. “जनतेची दिशाभूल सहन केली जाणार नाही. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
एप्रिलपासून नालेसफाई मोहिमेसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष काम अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाला पुढील १५ दिवसांत सर्व नाले स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी अतिरिक्त जेसीबी आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button