
ऐतिहासिक ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका वेंगुर्ल्याकडे रवाना!वेंगुर्ले येथील ऐतिहासिक दीपगृह (लाइट हाऊस) परिसरातील समुद्रात ही युद्धनौका बुडवून देशातील पहिल्या महत्त्वाकांक्षी ‘पाण्याखालील पर्यटन’ प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली जाणार
भारतीय नौदलाच्या गौरवशाली आणि पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारी ऐतिहासिक युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ तब्बल १४ महिन्यांच्या प्रदीर्घ मुक्कामानंतर रविवारी सायंकाळी विजयदुर्ग बंदरातून वेंगुर्ल्याकडे रवाना झाली.
१५ मार्च २०२५ रोजी ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात आणण्यात आली होती. आता वेंगुर्ले येथील ऐतिहासिक दीपगृह (लाइट हाऊस) परिसरातील समुद्रात ही युद्धनौका बुडवून देशातील पहिल्या महत्त्वाकांक्षी ‘पाण्याखालील पर्यटन’ प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला एक अत्यंत वैभवशाली आणि नवी दिशा मिळण्याची मोठी अपेक्षा व्यक्त होत आहे.
३० डिसेंबर १९८५ रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालेली ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका तब्बल ८१ मीटर लांबीची असून तिची विस्थापन क्षमता सुमारे १२०० टन एवढी आहे. ही युद्धनौका ३० मिमी क्लोज रेंज गन आणि अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर्सने सुसज्ज होती. देशरक्षणासाठी नेहमीच युद्धसज्ज असणाऱ्या या जहाजाने केवळ संरक्षणातच नव्हे, तर अनेक नैसर्गिक आपत्तींच्या काळात देशवासीयांसाठी देवदूताचे काम केले. आपत्तीच्या काळात मदतकार्य करणे, अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे आणि आपत्कालीन रसद व साहित्य वितरणात या नौकेने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.
अशी झाली प्रवासाची तयारी…
कारवार नौदल तळावरून ही युद्धनौका सन्मानाने निवृत्त झाल्यानंतर, तिचा वापर पर्यटनासाठी करण्यासाठी ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यानंतर ती विजयदुर्ग बंदरात आणून ठेवण्यात आली होती. आता वेंगुर्ले येथे समुद्रात बुडविण्यापूर्वी या जहाजातील सर्व यंत्रसामग्री आणि साहित्य काढून ते पूर्णपणे रिकामे (डीकमिशन आणि क्लीन) करण्यात आले आहे, जेणेकरून सागरी पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.
पर्यटनाचा नवा अध्याय!
वेंगुर्ले येथील दीपगृह परिसरातील समुद्रात ही युद्धनौका बुडवल्यानंतर, तिथे कृत्रिम खडक तयार होईल. यामुळे सागरी जीवसृष्टीला तर चालना मिळेलच, सोबतच देश-विदेशातील पर्यटकांसाठी ‘स्कुबा डायव्हिंग’ आणि ‘अंडरवॉटर टुरिझम’चे हे एक मोठे केंद्र बनेल. ऐतिहासिक युद्धनौकेला जवळून पाहण्याचा थरार पर्यटकांना अनुभवता येणार असल्याने सिंधुदुर्गाच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी गती मिळण्याची चिन्हं आहेत. गोवा राज्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारा स्वच्छ मानला जातो. मात्र पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे पर्यटकांना भुरळ असलीतरी अडथळे दूर करत पर्यटन करावे लागते. वेंगुर्ला निवती बेटाला सुंदरता लाभली आहे. समुद्रा खालिल पर्यटन यामुळे खुले होणार आहे.




