
कोकण सातारा जोडणारा ड्रीम प्रोजेक्ट ब्रिज पूर्ण



रत्नागिरी
राज्यात अनेक महामार्ग अत्याधुनिक ब्रिज उभारून प्रवास सोपा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई पुणे अंतर कमी करण्यासाठी मिसिंग लिंक मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. आता लवकरच कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर सातारा हे अंतर कमी होणार आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाला, उद्योगांना चालना मिळावी यासाठी आता लवकरच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून थेट महाबळेश्वर सातारा येथे जाण्यासाठी आता लवकरच नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे. मुंबईतील वरळी सी लिंक प्रमाणे असलेल्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या केबल स्टेड ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. या पुलावरील पर्यटकांसाठी असलेल्या व्ह्यू गॅलरीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यानंतर या पुलाचे उद्घाटन होणार आहे. पर्यटक व नागरिकांना लवकरच हा नवा मार्ग खुला होणार आहे. तब्बल 175 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या तापोळा आहिर हा ब्रिज आता पूर्ण झाला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांची पाहणी करून या पुलाची व्हेईकल ट्रायलही घेण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे कोकण व सातारा जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळणार आहे.

या मोठ्या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर हे तब्बल 50 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे थेट कोकणातील रत्नागिरी व पश्चिम महाराष्ट्रातील सातारा हे दोन्ही जिल्हे जोडले जाणार आहेत. याच ब्रिजवर पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी उभी करण्यात आली आहे. या गॅलरीमुळे सह्याद्रीतील कोयनाचे बॅक वॉटर व अत्यंत विलोभनीय दृश्य असलेल्या सनराइज् व सनसेटचेही दर्शन होणार आहे. तापोळा ते पलीकडच्या कोकणच्या दिशेला गाढवली आहिर असा हा ब्रिज उभारण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात प्रस्तावित असलेल्या या पुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या भागातील कामांना गती मिळाली आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. कोयना खोऱ्यातील दुर्गम भाग यामुळे जोडला जाणार आहे. नागरिकांचा पावसाळ्याच्या दिवसात याचा मोठा फायदा होणार असून पाण्यातील जीवघेणा बार्ज मधील प्रवास वाचणार आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाट मार्गे या पुलावरून सातारा व महाबळेश्वर हा जवळचा प्रवास करता येणार आहे.
तब्बल 175 कोटी रुपयांचा हा ब्रिज आहे. मुंबईतील वरळी सी लिंक प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा स्वरूपाचा हा पहिल्यांदीच केबल स्टे ब्रिज उभारला जात आहे. 540 मीटर लांबी व 14 मीटर रुंदीचा हा पूल आहे. याच पुलाच्या मध्यवर्ती 43 मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी आहे. या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट असणार आहेत. तसेच दोन्ही बाजूंनी जिन्याचे मार्गही असणार आहे. या प्रकल्पाचे काम टी अँड टी कंपनी करत आहे. अवघ्या गेल्या तीन वर्षात हा पूल उभारण्यात आला आहे
त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा अवघड आंबेनळी घाट मार्ग वाचणार आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाट मार्ग या नव्या ब्रिजवरून पलीकडे तापोळा मार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा जाता येणार आहे. त्यामुळे जवळपास 50 किलोमीटरच्या अंतर कमी होणार आहे. यास मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे त्यामुळे तापोळा ते सातारा हे अंतर दहा ते पंधरा किलोमीटरने कमी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव असलेलं दरे ते बामणोली कोयना खोऱ्यातील गाव जोडणारा 300 कोटी रुपयांचा आणखी एक ब्रिज उभा राहात आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना, खांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा उपयोग होणार आहे. पावसाळ्यात या खोऱ्यातील नागरिकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क सुटतो अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते आहे. या मोठ्या पुलांमुळे पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक ठरणारा जीवघेणा कोयना बॅकवॉटरमधून बार्ज मधील प्रवास वाचणार आहे. कोयना खोरे परिसर असलेल्या या भागातील या पुलाबरोबरच अन्य तीनही पुल उभारणीच काम गतीने सुरू आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या या पुलाचे काम आता पूर्ण झाला आहे व्ह्यू गॅलरीचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात असल्याची माहिती माहिती महाबळेश्वर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय देशपांडे यांनी बोलताना दिली.
खोऱ्यातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास वाचेल
या कोयना खांदाटी खोऱ्यातील नागरिकांना रघुवीर घाट मार्गे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथेच बाजारहाट करण्यासाठी यावे लागते. मात्र पावसाळ्याच्या दिवसात जीवघेणा बार्ज मधून प्रवास करावा लागतो त्यामुळे अनेकदा अपघाताची भीती असते. हा प्रवास आता या पुलामुळे वाचणार आहे. दोन्ही बाजूकडील रस्त्यांची व छोट्या पुलांची कामही सुरू असून प्रगतीपथावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली




