
देशभरातील सर्व फार्मासिस्ट, औषध विक्रेते आणि केमिस्ट यांनी आगामी २० मे रोजी ‘देशव्यापी बंद’ ची हाक दिली
ऑनलाइन औषध विक्रीच्या वाढत्या प्रभावामुळे आणि त्यातील कथित अनियंत्रित नियमांमुळे पारंपरिक औषध व्यवसाय संकटात सापडला आहे.याच्या निषेधार्थ देशभरातील सर्व फार्मासिस्ट, औषध विक्रेते आणि केमिस्ट यांनी आगामी २० मे रोजी ‘देशव्यापी बंद’ ची हाक दिली आहे. या आंदोलनामुळे देशभरातील औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असल्याने आरोग्य सेवांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
औषध विक्रेत्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत या बंदचे नियोजन केले असून, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
बंदच्या दिवशी रुग्णांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होऊ नये, यासाठी केमिस्ट असोसिएशनने नागरिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
विशेषतः ज्या रुग्णांना नियमितपणे औषधोपचार सुरू आहेत, त्यांनी आपली औषधे २० मे पूर्वीच खरेदी करून ठेवावीत,असे सांगण्यात आले आहे.यामध्ये प्रामुख्याने खालील आजारांच्या औषधांचा समावेश आहे.बी.पी.(रक्तदाब) ची औषधे, शुगर (मधुमेह) ची औषधे,थायरॉईड आणि इतर सर्व नियमित लागणारी जीवनरक्षक औषधे
पारंपरिक औषध विक्रेत्यांच्या मते, ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांमुळे नियमांचे उल्लंघन होत असून,डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री होण्याचा धोका वाढला आहे यामुळे लाखो किरकोळ औषध विक्रेत्यांच्या आणि फार्मासिस्टच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपले सहकार्य म्हणजेच आमच्या अस्तित्वाला बळ.औषध विक्रेते एकता जिंदाबाद! असा नारा देत विक्रेत्यांनी या आंदोलनात जनतेचे सहकार्य मागितले आहे.
असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, हा बंद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केला जात असून,यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासा बद्दल त्यांनी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे.
तसदीबद्दल क्षमस्व असे म्हणत, हा लढा औषध व्यवसायाची गुणवत्ता आणि सुरक्षा टिकवण्यासाठी असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.




