अनेक समस्यांमुळे कोकणात आलेले पर्यटक माघारी फिरू लागले.


देशातील वाढते प्रदूषण, आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थिती, इंधन टंचाई आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या संभाव्य लॉकडाऊनच्या चर्चामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ऊन्हाळी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेले पर्यटक आता मुक्काम अर्धवट सोडून परतीच्या प्रवासाला लागल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. काही हॉटेल चालकांनी गॅस उपलब्ध नसल्याने आपले हॉटेल तात्पुरते बंद ठेवले असून, काही ठिकाणी पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गॅस आणि इतर इंधनाच्या वाढत्या खर्चाचा परिणाम थेट खाद्यपदार्थांच्या दरांवर झाला आहे. जेवणाच्या ताटांचे दर वाढले असून सर्वसामान्यांचा आवडता वडापावही महाग झाला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रत्नागिरीतील अनेक पेट्रोल पंप आणि सीएनजी केंद्रांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. अनेक पर्यटकांचा अर्धा दिवस केवळ सीएनजीसाठी प्रतीक्षा करण्यातच जात असल्याने पर्यटक त्रस्त झाले आहेत.
सोशल मीडियावर पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याबाबत विविध चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात इंधनाचा अधिक तुटवडा निर्माण झाला किंवा प्रवासावर निर्बंध आले तर मोठी गैरसोय होईल, या धास्तीने अनेक पर्यटकांनी रत्नागिरीतील आपली सहल अर्धवट सोडून तातडीने परतीचा निर्णय घेतला आहे. काही पर्यटकांनी आगाऊ केलेली हॉटेल बुकिंगही रद्द केल्याने पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे.
याचा सर्वाधिक फटका हापूस आंबा व्यवसायालाही बसत आहे. रत्नागिरीत येणारे पर्यटक मोठ्याप्रमाणात हापूस आंब्याची खरेदी करत असतात. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यातही आंब्याला चांगला दर मिळतो. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून त्यात पर्यटकांची घट झाल्याने मागणी कमी झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button