
महावितरणची वादळी संकटातही अखंड ग्राहकसेवा
लांजा तालुक्यातील वीजपुरवठा 100 टक्के पूर्ववत
9 मे 2026 रोजी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लांजा तालुक्यातील वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणच्या लांजा उपविभागांतील लांजा 1, लांजा 2, भांबेड आणि साठवली या चारही शाखांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावे, वाड्या प्रभावित झाल्या होत्या.
वादळाच्या तडाख्यात सुमारे 30 उच्चदाब वाहिन्यांचे (HT) पोल तसेच 118 लघुदाब वाहिन्यांचे (LT) पोल तुटून पडले. तब्बल 8 रोहित्र नादुरुस्त झाली, तर 3 रोहित्र केंद्रे कोसळून त्यांचे मोठे नुकसान झाले. 15 ठिकाणी रोहित्र केंद्रांच्या केबल जळाल्या. याशिवाय 1 डबल पोल स्ट्रक्चर, 7 व्ही-क्रॉस तसेच 126 उच्चदाब आणि लघुदाब वाहिन्या तुटून पडल्या होत्या. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे आणि त्यांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर कोसळल्याने अनेक विद्युत खांब झुकले होते.
या परिस्थितीनंतर महावितरणने युद्धपातळीवर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले. शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी, वायरमन, लाईन स्टाफ तसेच दुरुस्ती एजन्सींना विविध भागांत कार्यरत करण्यात आले होते. अनेक भागांमध्ये, वाड्यांमध्ये आणि शेतांमध्ये विजेचे खांब पडलेले असल्याने सर्व ठिकाणी एकाचवेळी पोहोचणे कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हानात्मक ठरत होते. अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्यामुळे तसेच दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे पोल वाहतूक करणे अत्यंत जिकिरीचे ठरत होते. तरीही प्रतिकूल परिस्थितीत नुकसानग्रस्त वाहिन्या, खांब आणि उपकरणांची दुरुस्ती वेगाने करण्यात आली. सदर हानी अत्यंत मोठी असल्याने वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागला. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता, दिवस-रात्र अथक परिश्रम घेत टप्प्याटप्प्याने लांजा तालुक्यातील ग्राहकांचा वीजपुरवठा 100 टक्के सुरळीत करण्यात यश मिळविले आहे.
रत्नागिरी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग पाटणकर हे वादळ झालेल्या दिवसापासून उपविभागात उपस्थित राहून नुकसानग्रस्त भागांचा सातत्याने आढावा घेत होते. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, रत्नागिरी मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने तसेच रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक साहित्य, अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली.
लोकप्रतिनिधींनी घेतली कामाची दखल :
लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. किरण (भैय्या) सामंत यांनी वीजपुरवठा खंडित झालेल्या भागांना प्रत्यक्ष भेट देत कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची काळजी घेऊन ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या भेटीमुळे आणि कौतुकाच्या शब्दांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगण्यात आले.




