विनापरवाना ट्रॅक्टर चालवणे जीवावर बेतले,दापोलीतील भीषण अपघातात चालक ठार; दोन मजूर गंभीर जखमी


दापोली तालुक्यातील भोईवाडी ते फरारे जंगलजेटी मार्गावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ११ मे रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बंधन बडाईक (वय २८, मूळ रा. झारखंड, सध्या रा. दस्तुरी, ता. खेड) हा ट्रॅक्टर (एमएच-१७-व्ही-४९६) घेऊन भोईवाडीकडून फरारे जंगलजेटीकडे जात होता. रस्त्याचे काम सुरू असताना उताराच्या मार्गावर ट्रॅक्टरवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. या अपघातात सुनील याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातावेळी ट्रॅक्टरवर बसलेले दोन मजूरही ट्रॅक्टरखाली अडकल्याने गंभीर जखमी झाले. सोनाली (शानाबाई) तुकाराम चव्हाण (वय ४०) यांना डोके, पाय, कंबर आणि मांडीला गंभीर दुखापत झाली असून संतोष दत्तू चौगले (वय ४१) हेही जखमी झाले आहेत. दोघांवर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात मृत चालकाकडे ट्रॅक्टर चालवण्याचा अधिकृत परवाना नसल्याचे तसेच वाहन चालवण्याचे तांत्रिक ज्ञानही नसल्याचे समोर आले आहे. निष्काळजीपणे व विनापरवाना वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button