
पाचल बाजारपेठेत वाहतूक कोंडीवर प्रशासनाने विशेष मोहीम राबविली
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या पाचल गावामध्ये वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. मुंबईहून पुणे, मलकापूर, अनुस्कुरा आणि पाचल मार्गे मालवण तसेच गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. परिणामी पाचल बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत असून नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
या समस्येमध्ये भर म्हणजे काही व्यापाऱ्यांकडून मुख्य रस्त्यावरच व्यवसाय थाटला जात होता. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. विशेषतः आठवडा बाजाराच्या दिवशी परिस्थिती अधिकच गंभीर बनत होती.
या वाढत्या समस्येची दखल घेत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने नुकत्याच पार पडलेल्या बुधवारच्या आठवडा बाजारादरम्यान विशेष मोहीम राबवली. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना समज देण्यात आली. तसेच आठवडा बाजारासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्येच व्यवसाय करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या.
प्रशासनाच्या या नियोजनबद्ध कारवाईचा सकारात्मक परिणाम बाजारात स्पष्टपणे दिसून आला. बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असूनही वाहतूक कोंडी झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाच्या कामाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत बाबालाल फरास, विनायक सक्रे, देवेंद्र पवार, कमलाकर पाटील, स्वप्नील घाडगे, रामदास पाटील, कल्पेश सुतार, समीर खानविलकर, विहंग खानविलकर, तसेच तुषार पाचलकर यांच्यासह ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पाचल बाजारपेठेतील वाहतूक समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने अशाच प्रकारे सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.




