
किरकोळ वादातून मच्छीमारावर सुरीहल्ला; गोळप परिसरात खळबळ
रत्नागिरी : “तुम्ही लग्नाला जाता की दारू प्यायला जाता?” या किरकोळ प्रश्नावरून झालेल्या वादाचे पर्यवसान सुरीहल्ल्यात झाले. रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे ५५ वर्षीय मच्छीमारावर सुरीने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत मजिद सारंग (वय ५५, रा. गोळप मोहल्ला) हे गुरुवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता गोळप येथील मशिदीजवळ थांबले होते. त्यावेळी शैबाज युसुफ मजगावकर (वय ४९) याने त्यांना “तुम्ही लग्नाला जाता की दारू प्यायला जाता?” असा उपरोधिक सवाल केला.
या वक्तव्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. “तू मला असे का बोलला?” अशी विचारणा करताच आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाद वाढू नये म्हणून शौकत सारंग तेथून निघून घरी गेले.
मात्र, काही वेळाने आरोपी शैबाज मजगावकर हा सारंग यांच्या घराजवळ गेला आणि त्यांना पुन्हा मशिदीजवळ बोलावले. तेथे आल्यानंतर आरोपीने त्यांचा डावा हात पकडून सोबत आणलेल्या सुरीने डोक्याच्या डाव्या बाजूला व कपाळावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात शौकत सारंग गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमी सारंग यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.




