
️मुंबई शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपये बुडाले; सेन्सेक्स-निफ्टीसा नेमका कशाचा फटका?
Stock Market Sensex Nifty Affected By US Iran Conflict : अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा करारापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरल्यामुळे, जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढीच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली.
सकाळी ९:१५ वाजता, सेन्सेक्स ८४८.४५ अंशांनी (किंवा १.१० टक्क्यांनी) घसरून ७६,४७९.७४ वर पोहोचला, तर निफ्टी २४५ अंशांनी (किंवा १.०१ टक्क्यांनी) घसरून २३,९३१.१५ वर व्यवहार करत होता. आज बाजाराची एकूणच व्याप्ती कमकुवत दिसत आहे. यामुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४७३.५ लाख कोटी रुपयंवरून घसरून सुमारे ४६९.५ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ज्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
बाजारातील अस्थिरताही वाढली, ज्यामध्ये ‘इंडिया VIX’ (India VIX) ५ टक्क्यांहून अधिक वाढला. कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑटो, रिअल्टी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स या घसरणीमध्ये आघाडीवर आहेत. तर माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील शेअर्सनी तुलनेने अधिक स्थिरता दर्शविली. व्यापक बाजारपेठाही दबावाखाली आहेत, निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० हे निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
बाजार का कोसळत आहे?
पश्चिम आशियातील संकटाबाबत पुन्हा निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे, ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १०५ डॉलर्सच्या पातळीवर पुन्हा गेल्यानंतर बाजारातील वातावरण मंदीचे झाले. त्याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे, अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचे आणि सोने, खाद्यतेले व रासायनिक खते यांसारख्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे केलेले अलीकडील आवाहनावरही गुंतवणूकदारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
विश्लेषकांच्या मते, ज्या वेळी कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वेगाने वाढत आहेत, अशा वेळी भारताचे आयात बिल आणि चालू खात्यातील तूट (Current Account Deficit) यांबाबत सरकारमध्ये वाढणारी चिंता या विधानांतून अधोरेखित झाली आहे.
गेल्या ट्रेडिंग सत्रात काय घडले?
जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि नव्याने निर्माण झालेल्या भू-राजकीय चिंतांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक शुक्रवारी दिवसभर दबावाखाली राहिले आणि अखेरीस घसरणीसह बंद झाले होते. निफ्टी ५० निर्देशांक १५० अंशांनी घसरून २४,१७६ वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स ५१६ अंशांनी कोसळला आणि ७७,३२८ वर बंद झाला होता.




