
काळजाचा ठोका चुकला! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग!!
मुंबई : शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. खराब हवामान आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरला मोठा फटका बसला आहे. वैमानिकाच्या प्रसंगावधामुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहू एअरपोर्टवर उतरवण्यात यश आले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून कल्याण आणि मुरबाड दौऱ्यासाठी रवाना झाले होते. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हवामानात अनपेक्षित बदल झाला. कल्याण परिसरात अचानक वादळी वारा आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले. हे हेलिकॉप्टर हवेत असतानाच या वादळाच्या तडाख्यात सापडले. सोसाट्याचा वारा आणि खराब दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. अशा गंभीर परिस्थितीत प्रसंगावधान राखून वैमानिकाने तांत्रिक कौशल्याचा वापर केला आणि हेलिकॉप्टरला वादळाच्या क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर नेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने हेलिकॉप्टर तात्काळ जुहू विमानतळाच्या दिशेने वळवले आणि तिथे यशस्वी ‘इमर्जन्सी लँडिंग’ केले.
हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते?
या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्र्यांसोबत एकूण आठ जण उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने खालील व्यक्तींचा समावेश होता एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), प्रभाकर काळे (स्विय सहाय्यक), विनायक पात्रूडकर (मुख्य जनसंपर्क अधिकारी), राजपूत (OSD), मुख्य सुरक्षा अधिकारी आणि अन्य कर्मचारी.
उपमुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यात बदल
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व अधिकारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.



