
लहान बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
खेड : लहान बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रोहन शंकर पालकर, (वय- २३ वर्षे, रा. खारी-सुसेरी, ता. खेड) यास आज (६ मे) खेड येथील न्यायालयाने (जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी भा.द.वि. कलम ३७६ (२) (जे) (एन), ३७६ (एफ), ३७६ (३) (ए) ५०६ (ए), पोस्को ४, ५, ६, ८, १०, १२ खाली अन्वये दोषी धरुन शिक्षा ठोठावण्यात आली आहे. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ५३८/२०२१ , सेशन केस नं. २/२०२२ प्रमाणे या गुन्ह्याची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात पार पडली.
आज या गुन्ह्याचा निकाल होवून आरोपीला भा.द.वि. कलम ३७६ (२) (जे) (एन) अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व पाच. जेहजार रुपये ५०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ३७६ (३) अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व ५०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ३७६ (एफ) अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ५०६ (ए) अन्वये ६ महिने सश्रम कारावास, पोस्को कलम ४ व ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, पोस्को कलम ८ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, पोस्को कलम १० अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, पोस्को कलम १२ अन्वये १ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
थोडक्यात हकिकत अशी की, पीडीत बालिका ही शालेय विद्यार्थिनी असून कोविड काळामध्ये ऑनलाईन क्लासला आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता आरोपी याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेवून, पिडीतेस धमकावून तिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केले. तसेच हि बाब कोणाला सांगितल्यास पिडीतेस, व तिच्या आई- वडिलांस जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीस घाबरून पीडीता झालेल्या अत्याचाराबद्दल कोणाशीही बोलली नाही; परंतु याप्रकरणी पिडीतेचा मासिक धर्म यास दिरंगाई झाल्याने तिच्या आईने पिडीतेला डॉक्टरकडे घेवून गेली असता तपासणीअंती सर्व प्रकार उघड झाला. सबब आरोपीवर खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण ११ साक्षीदार तपासण्यात आले. सदरकामी पिडीतेची स्वतःची साक्ष, तसेच डीएनए अहवाल महत्त्वाचे ठरले. तसेच वैद्यकीय पुरावा डीएनए अहवाल याकामी निर्णयात्मक ठरले. सर्व गोष्टीचा मे. कोर्टाने साकल्याने विचार करून आरोपी विरुध्द गुन्हा सिद्ध झाला असल्याचे जाहीर केले. याप्रकरणी सरकारी वकील ॲड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करून संपूर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार श्रीमती सोनाली झेंडे महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे खेड तसेच कोर्ट पैरवी चंद्रमुनी ठोके यांचे अनमोल सहकार्य लाभले.




