
बारावीची पुरवणी परीक्षा जून-जुलैमध्ये; आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
कोकण विभागीय मंडळ : नियमित शुल्कासह १५ मे पर्यंत मुदत
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १२वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अनुत्तीर्ण आणि श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे बिगुल वाजले आहे. जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार असून, त्याची प्रक्रिया आजपासून (५ मे) सुरू होत असल्याची माहिती कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनिता गुरव यांनी दिली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले पुनर्परिक्षार्थी, तसेच खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे विद्यार्थी आणि आयटीआय विषय घेऊन क्रेडिट ट्रान्सफर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालयामार्फत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ५ मे ते १५ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे विद्यार्थी या मुदतीत अर्ज भरू शकणार नाहीत, त्यांना १६ मे ते २० मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची संधी उपलब्ध असेल.
ऑनलाईन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील विद्यार्थ्यांची माहिती थेट घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेषतः श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा सलग तीन संधी उपलब्ध असतील, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शुल्क एनईएफटी (NEFT) किंवा आरटीजीएस (RTGS) द्वारेच भरायचे असून, कोणत्याही परिस्थितीत रोख स्वरूपात शुल्क स्वीकारले जाणार नाही. विहित मुदतीत अर्ज आणि शुल्क न भरल्यास संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे मिळणार नाहीत, याची नोंद सर्व शाळा व महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.



