
श्रीक्षेत्र गणपतीपुळेत अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे अंगारकी संकष्टीनिमित्त आज (५ मे) भक्तांचा महासागर लोटला आहे. श्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भल्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आज गणपतीपुळ्यात बघायला मिळाले. आज अंगारकी संकष्टीनिमित्त स्वयंभू ‘श्रीं’चे मंदिर पहाटे पूजाअर्चा, मंत्रपुष्प, आरती होऊन भाविकांना दर्शनासाठी पहाटे ३:३० वाजता उघडण्यात आले.
पहाटेपासूनच हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. यामध्ये पर्यटकांची संख्या लक्षणीय होती.
संपूर्ण दिवसभर दर्शन खुले राहणार आहे. सायंकाळी ४:३० वाजता ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक होऊन रात्री ११ वाजता मंदिर बंद होईल. श्रीदेव गणपतीपुळे संस्था, गणपतीपुळे ग्रामपंचायत, तसेच पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आजच्या अंगारकीनिमित्त नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ऐन पर्यटक हंगामात अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने भाविकांची गर्दी हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किनाऱ्यावरही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळेमार्फत सुरक्षारक्षक, ग्रामपंचायत जीवरक्षक व पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच ध्वनी प्रक्षेपण करून सूचना देण्यात येत आहेत. तसेच वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, जयगड पोलिस स्थानकाचे निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी १८ पोलिस अधिकारी व १८० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.




