नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक; १.४० लाख कोंबड्या नष्ट करण्याची तयारी!

Bird flu : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा (एव्हियन इन्फ्लूएंझा) उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले असून तीन पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.१२ आणि १३ एप्रिल रोजी नवापूरमधील काही पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे संशयास्पद मृत्यू झाले होते. यानंतर संबंधित नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील तीन पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली. घटनेनंतर तालुका स्तरावर आपत्कालीन समिती स्थापन करण्यात आली असून विविध विभागांना जबाबदाऱ्या निश्चित करून तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. नवापूर तालुक्यात कोंबड्यांची संख्या सुमारे १० लाख असल्याने संसर्गाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

बाधित तीन पोल्ट्री फार्मसह एक किलोमीटर परिसरातील सहा पोल्ट्री फार्ममधील सुमारे एक लाख ४० हजार कोंबड्यांचे एक मेपासून शास्त्रशुद्ध पद्धतीने कलींग (नष्ट) करण्यात येणार आहे. तसेच तीन किलोमीटरचे क्षेत्र कंटेनमेंट आणि पाच किलोमीटरचे क्षेत्र बफर जाहीर करण्यात येणार असून या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, या आजारामुळे अद्यापपर्यंत मानवी जीवितहानी झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अंडी आणि कोंबडीचे मांस खाताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर जिल्ह्यांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आली आहे.

२००६, २०२१ मध्येही नवापूरमध्ये उद्रेक

याआधीही २००६ आणि २०२१ या वर्षी नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. त्यावेळी लाखो कोंबड्याची कलींग प्रक्रिया राबविण्यात आली होती. तर लाखोंच्या संख्येने अंडी नष्ट करण्यात आली होती. यामुळे आधीच नवापूरचा पोल्ट्री फार्मचा उद्योग रसातळाला गेला असून आता पुन्हा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्यास नंदुरबार जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाचे कंबरडेच मोडणार आहे. नवापूर हे गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असून याठिकाणाहून महाराष्ट्रासह गुजरातला मोठ्या प्रमाणात अंडी पुरवठा होत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button