भारत टिपणारे छायाचित्रकार’ रघु राय काळाच्या पडद्याआड

पीटीआय, नवी दिल्ली : छायाचित्रांतून बदलत्या भारताचे आणि भारतीय समाजजीवनाचे सार टिपणारे ख्यातनाम छायाचित्रकार रघु राय यांचे रविवारी पहाटे निधन झाले. सहा दशकांहून अधिक काळ छायाचित्रांच्या क्षेत्रात ठसा उमटवणारे आणि छायापत्रकारितेचा मानबिंदू असलेल्या ८३ वर्षीय राय यांची कर्करोगाशी असलेली झुंज संपली आणि नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राय यांना दोन वर्षांपूर्वी प्रोस्टेट ग्रंथींच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यातून ते बरेही झाले. त्यानंतर तो पोटात पसरला. अलीकडे कर्करोग मेंदूत पसरल्याने आणि त्यानंतर वयाशी संबंधित समस्या निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली, असे राय यांचे पुत्र छायाचित्रकार नितीन राय यांनी सांगितले. रघु राय यांच्या पश्चात पत्नी गुरमीत, मुलगा नितीन व मुली लगन, अवनी व पूरवाई असा परिवार आहे. सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबमधील झांग येथे १८ डिसेंबर १९४२ रोजी जन्मलेल्या राय यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. सरकारी नोकरी मिळवणे, टिकवणे अवघड नसताना त्यांनी तो मार्ग सोडला आणि भावाप्रमाणे- छायाचित्रकार एस. पॉल यांच्याप्रमाणे- कॅमेरा हाती घ्यायचे ठरवले. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी छायाचित्रणाला सुरुवात केली. आधी हिंदुस्तान टाइम्स, मग १९६६ मध्ये ‘द स्टेट्समन’ वृत्तपत्रात मुख्य छायाचित्रकार म्हणून रुजू झाले. त्यानंतर सहा दशके त्यांच्या कॅमेर्‍याने अतुलनीय स्पष्टतेने क्षणभंगुर क्षण टिपले आणि भारताच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचे दस्तऐवजीकरण केले.

हेन्री कार्तिए -ब्रेसाँ यांची छायाचित्रे स्वातंत्र्याच्या उदयकाळात गाजली होती. कळत्या वयात ती पाहातच वाढलेल्या रघु राय यांच्यावर तो प्रभाव निश्चितपणे होता आणि कार्तिए -ब्रेसाँ यांच्याशी त्यांची भेटही झाली होती. पॅरिसमध्ये गॅलरी डेल्पिए येथे १९७१ साली राय यांची छायाचित्रे प्रदर्शित झाली. ती पाहिल्यावर कार्तिए -ब्रेसाँ यांनी ‘मॅग्नम’ या जागतिक छायाचित्र- संग्रहाला राय यांची शिफारस केली आणि वयाची तिशी गाठण्याच्या आत राय यांच्या कामावर ‘मॅग्नम’ची सुवर्णमोहोर उमटली. पुढल्या काळात या निष्णात छायाचित्रकाराने भारतीय आधुनिक इतिहासातील काही सर्वात महत्त्वपूर्ण घटनांचे छायाचित्रण केले, ज्यात १९७२ चे बांगलादेश निर्वासित संकट आणि १९८४ ची भोपाळ गॅस दुर्घटना यांचा समावेश आहे. श्रमिकांची गर्दी आणि कलावंतांचे लोभस एकलेपण किंवा भोपाळच्या संहाराची तिडीक आणि मशीद पाडण्यापूर्वीची अयोध्यतेतील सहजरम्यता अशा कित्येक टोकांना रघू राय यांच्या छायाचित्रांनी नेमके चिमटीत पकडले. ही छायाचित्रे कृष्णधवल होती. काळा आणि पांढर्‍याच्या मधल्या कैक छटांतून त्यांनी क्षण जिवंत केले. पुढे ते रंगीत छायाचित्रणाकडे वळले.

‘इंडिया टुडे’ हे जेव्हा केवळ एक इंग्रजी वृत्त- पाक्षिक होते, त्या १९८१ ते १९९२ या काळात रघु राय हे त्या पाक्षिकाचे छायाचित्र संपादक (चीफ फोटो एडिटर) होते. विशेषत: १९८२, ८३ मध्ये या पाक्षिकाची चार-पाच पाने राय यांच्या छायाचित्र-निबंधांसाठी राखीव असत. त्यातून बदलत्या भारताचे चित्र दिसे. हा भारत सर्वसामान्यांचा होता. रोजच्या बातम्यांमध्ये जे काही येत असे, त्यापेक्षाही अधिक संवेदनशीलतेने राय यांच्या कॅमेर्‍याने सर्वसामान्य माणसांचे जगणे टिपले. त्याच वेळी, इंदिरा गांधी, दलाई लामा, मदर तेरेसा, सत्यजित राय, मल्लिकार्जुन मन्सूर आणि बिस्मिल्ला खान यांसारख्या ख्यातनाम व्यक्तींच्या व्यक्तिचित्रांमधून भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक छटा राय यांनी नोंदवल्या, ज्यातून त्यांच्या जीवनाचे आजवर अज्ञात असलेले दृष्टिकोन समोर आले. व्यक्तिमत्व नेमके पोहोचवणे, हे त्यांच्या या छायाचित्रांचे वैशिष्ट्य- ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या (मागे वाघ, खुर्चीत बसलेले ठाकरे, ओठांत पाइप – अशा) छायाचित्रात इतके नेमके उतरले की तीच बाळासाहेबांची चिरस्मरणीय प्रतिमा ठरली. पत्रकाराची धमक रघु राय यांच्यामध्ये होती. अगदी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्यापर्यंत पोहोचून, त्यांना खास पंजाबी ढंगात ‘पा- जी’ संबोधून त्यांची आणि त्यांच्या शीख सहकार्‍यांचीही छायाचित्रे राय यांनी टिपली. पुढे हेच भिंद्रनवाले इंदिरा गांधी यांच्या आदेशाने झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये मारले गेले. पुढल्या काळात ‘द सिख्स’ हे शिखांवरचे छायाचित्र- पुस्तकही राय यांनी केले, ते त्यांच्या अन्य पुस्तकांपेक्षा वेगळे ठरले.

रघु राय यांच्या निधनाबद्दल अनेक नामवंत छायाचित्रकार तसेच छायाचित्र-संग्राहकांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्या बहुतेकांनी ‘भारताला नेमके टिपणार्‍या छायाचित्रकारास आपण मुकलो’ अशा अर्थाची आदरांजली वाहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button