
खेडमध्ये जंगलात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला ; परिसरात खळबळ
खेड : तालुक्यातील तळवटपाल परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह जंगलमय भागात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मृत तरुणाचे नाव सुरेश पांडुरंग आखाडे (वय ३५, रा. तळवटपाल, गणेशवाडी) असे असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश आखाडे हे कामानिमित्त घराबाहेर पडले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
शोधमोहीम सुरू असतानाच तळवटपाल-देऊळवाडी येथील डांबरी रस्त्यालगत खालील बाजूस असलेल्या दाट झाडी व जंगलमय भागात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने गावकऱ्यांनी तातडीने खेड पोलिसांना माहिती दिली. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, आत्महत्या की घातपात, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



