
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रकल्प मार्गी लागल्याने पानवल धरण आता पूर्ण क्षमतेने भरणार
रत्नागिरी शहराला ग्रॅव्हीटीने पाणीपुरवठा करणारे धरण म्हणून ओळखल्या जाणार्या पानवल धरणाच्या नूतनीकरणाचे महत्वाकांक्षी काम अखेर शंभर टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प मार्गी लागल्याने शहरावर ओढवणारे पाणीटंचाईचे सावट आता कायमचे दूर होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून धरणाच्या मुख्य भिंतीला तडे गेल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. गळतीमुळे धरणाची साठवण क्षमता घटली होती. ज्याचा थेट फटका शहरवासियांना उन्हाळ्यात बसत होता. शासनाने मंजूर केलेल्या १६ कोटी रुपयांच्या विशेष निधीतून धरणाचे ग्राउटिंग आणि सांडव्याची दुरुस्ती ही तांत्रिक कामे अत्यंत कौशल्याने पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे आता धरणाची गळती पूर्णपणे थांबणार आहे. तर धरणाची भिंत पूर्णपणे सिमेंट कॉंक्रीटची झाल्याने ती आता अधिक सुरक्षित झाली आहे.
धरणाचे मुख्य स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. आता केवळ धरणातील गाळ काढणे आणि मुख्य पाणीपुरवठा वाहिनी जोडणे ही कामे शिल्लक आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले जाणार आहे.www.konkantoday.com




