
जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे एक दिवसीय कृती सत्र आज
रत्नागिरी : जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि जिल्हा शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आज (२५ एप्रिल) सकाळी १० वाजता माध्यमिक अध्यापक पतपेढी सभागृहात जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांचे एक दिवसीय कृती सत्र होणार असून या कृती सत्राचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी राजापूर-लांजा-विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत तसेच कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
या कृती सत्रामध्ये जिल्ह्यातील आदर्श मुख्याध्यापक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी आजचे शैक्षणिक वास्तव व मुख्याध्यापकांची भूमिका याविषयी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांचे मार्गदर्शन होणार आहे तर ताण तणाव आणि व्यवस्थापन यावरती माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी दीपक मेंगाने हे मार्गदर्शन करणार आहेत. तर अकरावी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन याविषयी सहाय्यक शिक्षण संचालक डॉ. गणपत कमळकर हे मार्गदर्शन करणार आहेत तसेच रजा नियम व अनुषंगिक कार्यवाही याविषयी राज्य मंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत हे मार्गदर्शन करणार आहेत तसेच यावेळी जिल्हाभरातील मुख्याध्यापकांचे शैक्षणिक शंका समाधान हा देखील उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कृती सत्राला जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने, जिल्हा सचिव महेश पाटकर यांनी केले आहे.




