
चांदोर येथील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात गावातील
रत्नागिरी तालुक्यातील चांदोर येथील ग्रामस्थांना बोटाचे ठसे घेऊनही हक्काचे धान्य नाकारणार्या रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरुद्ध या गावातील महिलांनी एल्गार पुकारला आहे. मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकार्यांसमोर याप्रकरणी झालेल्या सुनावणीत धान्य वितरण व्यवस्थेतील गंभीर दोष समोर आले. संबंधित दुकानदाराला दणका देत प्रशासनाने त्याचे अधिकार तूर्तास गोठवले आहेत. तर पर्यायी धान्य पुरवठा गावातील अन्य दुकानातून करण्याचे आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिले आहे.
चांदोर येथील रेशन दुकानात गेल्या काही महिन्यांपासून संतापजनक प्रकार सुरू होता. लाभार्थ्यांकडून ’पॉस’ मशिनवर बोटाचे ठसे घेतले जात होते मात्र प्रत्यक्षात धान्य मिळत नव्हते. वारंवार होणार्या या तक्रारींची दखल घेत २७ मार्च रोजी पुरवठा निरीक्षकांनी अचानक छापा टाकला असता, दुकानात वितरणात मोठी तफावत आणि गंभीर तांत्रिक दोष आढळून आले. यामुळे रेशनचा मोठा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा आता ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी २१ एप्रिल रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्यासमोर पार पडली. यावेळी संबंधित दुकानदार गैरहजर राहिले. मात्र गावातील १०० हून अधिक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला. यावेळी चांदोर सरपंच पूनम मेस्त्री, उपसरपंच सूर्यकांत तांबे, ग्रामपंचायत सदस्य उमेश गोताड, राजेंद्र बनकर, दिप्ती तरळ, सामाजिक कार्यकर्ते सुनील पड्याळ चंद्रकांत रेवाळे, रत्नाकर कांबळे, गोविंद पड्याळ प्रदीप कांबळे, दक्षता समिती सदस्य प्रदीप कांबळे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com




