गोमातेला राष्ट्रमाता घोषित होण्यासाठी २७ रोजी रत्नागिरीत गो-सन्मान पदयात्रा

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी : गोमातांचे संरक्षण आणि संवर्धन होऊन त्यांना राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी, यासाठी रत्नागिरीत २७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता श्री पतीतपावन मंदिर ते तहसील कार्यालयपर्यंत गो-सन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत सर्व व गोभक्त, गोरक्षक, गोप्रेमी हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभर गो-सन्मान आवाहन अभियान सुरु असून या अनुषंगाने श्री पतीतपावन मंदिर येथे काल सायंकाळी झालेल्या बैठकीत वृंदावन येथिल गोवत्स योगी श्री जगदिशानंद महाराज यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी श्री जगदिशानंद महाराज म्हणाले की, गोमाता ही हिंदुस्थानचा प्राण असुन आज गोमातेची होणारी उपेक्षा, तिची होणारी कत्तल ही देशाला व हिंदूंना लागलेला कलंक आहे आणि तो मिटवायची वेळ आली आहे. यासाठी गोमातेला राष्ट्रमाता घोषित केल्याशिवाय, तिला संरक्षित केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. यासाठी सर्व हिंदूंनी एकजुट होऊन गोमातेला राष्ट्रामातेचा दर्जा देण्यासाठी सोमवार, २७ एप्रिल रोजी समस्त हिंदूंनी गो-सन्मान पदयात्रेमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
या आवाहनाला सर्व हिंदु संघटना, संस्था, हिंदुत्ववादी, धर्माभिमानी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोमातेच्या संरक्षणासाठी गोपालन मंत्रालयाची स्थापना व्हावी, तसेच शेतकरी, गोशाळा यांना गोवंशाची देखभाल करण्यासाठी अनुदान मिळून गोमातांना संरक्षण मिळावे, गोमाता राष्ट्रमाता होणे आवश्यक आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या अभियानासाठी स्वाक्षरी मोहिम सुरू आहे, त्यामध्येसहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button