
अश्लील फोटो व व्हिडिओची धमकी देवून ६८ लाख रूपयांची खंडणी उकळणार्या आरोपीला खेड पोलिसांनी केली मुंबईत अटक
महिलेशी शारिरीक संबंध प्रस्थापित करत तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ पीडितेच्या घरातील लोकांना दाखवत व्हायरल करण्याची धमकी देत ६८ लाख रुपयांची खंडणी उकळणार्या गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (३०, रा. साखरोली, खेड) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. खेड पोलिसांनी त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. तो सौदी अरेबियात वास्तव्य करत होता.
९ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत संशयिताने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ६८ लाख रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतरही तो पीडितेकडे सातत्याने पैशांची मागणी करत होता. मात्र पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवले. याप्रकरणी पीडितेने येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जानेवारी २०२६ पासून गुलाम परकार सौदी अरेबियात नोकरीनिमित वास्तव्यास होता. १८ एप्रिल रोजी तो कामानिमित्ताने सौदी अरेबियातून मुंबई येथे आला असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. जी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथक मुंबईला रवाना झाले.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुरज मोरे यांचा समावेश होता. संशयित मुंबईत असल्याची खात्री पटल्यानंतर तो सौदी अरेबियात पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला गजाआड केले. पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्याने गुन्हयाची कबुली दिली. पीडितेकडून ६८ लाख रुपये खंडणी ऑनलाईन स्वरुपात स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.www.konkantoday.com




