
शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ९० लाखांची फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून पिता-पुत्राची तब्बल ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. महमद अवाद अजीज वागळे (२१. रा. ओसवालनगर, रत्नागिरी) याने याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी फैजान नुरुद्दीन शेख (२५, अमृतनगर, ठाणे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महमद वागळे व त्यांच्या वडिलांना आरोपी याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला मोठा परतावा मिळेल, असे अमिष दाखविले होते. त्यासाठी आरोपी फैजान याने चार महिन्यांच्या एका योजनेची माहिती दिली होती. आरोपी याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार व त्याच्या वडिलांनी ४ नोव्हेंबर २०२४ ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ९० लाख रुपये गुंतवले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यानंतरही तक्रारदार व त्याच्या वडिलांना परतावा मिळाला नाही. त्यानुसार दोघांनीही आरोपी याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. वर्ष उलटूनही आपले पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित आरोपी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com




