
शासकीय कार्यालयातून नागरिकांची कामे मार्गी लावा-पालकमंत्री उदय सामंत
शासकीय कार्यालये फक्त चकचकीत आणि टोलेजंग इमारती उभारून चालणार नाहीत तर त्यामधून सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागली पाहिजेत, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
तालुक्यातील नाखरे गावातील विकासकामांचे भूमिपूजन आणि पाच वर्षात मार्गी लागलेल्या कामांच्या अहवालाचे प्रकाशन सामंत यांनी केले. या वेळी शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर, पंचायत समिती रत्नागिरी सदस्य नेताजी पाटील, नामदेव कोकरे आदी उपस्थित होते. नाखरेचे माजी सरपंच विजय चव्हाण यांनी सहकाऱ्याना सोबत घेऊन केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या लोकोपयोगी कामांचा कार्यकर्तृत्व अहवालातून घेतलेला आढावा प्रेरणादायी असल्याचे सामंत यांनी सांगितले. भावी पिढी सुसंस्कृत घडविण्यासाठी जिल्हा परिषद शाळाच कारणीभूत असून आपण मराठी माध्यमातून शिकलो तरी आयुष्यात काहीही अडचण जाणवली नसल्याचे सांगत पालकांना मराठी शाळेत पाल्यांना पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक सुहास वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाखाप्रमुख रामदास लांजेकर, केदार पावसकर, संजय मांडवकर, महिला, युवा वर्ग यांनी परिश्रम घेतले.




