
मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर नजिक सोमवारी रात्री पारेख पेट्रोल पंपाजवळ एका अवजड वाहनाचा भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर नजिक सोमवारी रात्री पारेख पेट्रोल पंपाजवळ एका अवजड वाहनाचा भीषण अपघात झाला. दीड ते दोन फुटांच्या जीवघेण्या फरकामुळे वाहन हवेत लटकले आणि महामार्गावर ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून हजारो प्रवाशांना मध्यरात्री त्रास सहन करावा लागला या.महामार्गाच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून तिथून दुहेरी वाहतूक रेटली जात आहे. मात्र, पूर्ण झालेला मुख्य रस्ता आणि बाजूचा कच्चा रस्ता यामध्ये तब्बल दीड ते दोन फुटांची उंचीची दरी ठेकेदाराने उघडी ठेवली आहे. या चालकाच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर विजेरी प्रकाशझोतामुळे डोळे दिपले होते. याच दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू (साईड) देताना गाडी मुख्य रस्त्यावरून खाली उतरली. या ठिकाणी जर ठेकेदार कंपनीने बॅरेकेटर्स लावले असते किंवा रिफ्लेक्टर लाईट लावले असते, तर रस्त्याची कडा नेमकी कुठे संपते याचा अंदाज आला असता आणि हा अपघात टळला असता. मात्र, सुरक्षा साधनांच्या अभावामुळे रस्ता नेमका कुठे संपला हे न कळल्याने वाहनाचा अर्धा भाग मुख्य रस्त्यावर वाऱ्यावर लटकला, तर अर्धा भाग खाली कच्च्या रस्त्यावर आदळला.
यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांची मोठी कोंडी झाली. रात्रीच्या अंधारात लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले होते. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला. केवळ ठेकेदाराच्या बेजबाबदार पणामुळेच प्रवाशांना या संकटाचा सामना करावा लागला, अशी संतप्त चर्चा परिसरात सुरू होती. विशेष म्हणजे, यापूर्वी आरवली ते कांटे दरम्यान अनेक भीषण अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे.




