कौटुंबिक हिंसेवर मात करुन सुरभी वाडेकर बनल्या अनाथांची माय;


‘भाकर’ संस्थेत आजी-आजोबांच्या सेवेचा वसा
कौटुंबिक हिंसाचार आणि आपल्याच माणसांनी नाकारल्यानंतर आयुष्यात आलेल्या अंधारावर मात करून, श्रीमती सुरभी संदीप वाडेकर यांनी स्वतःचे एक नवे विश्व निर्माण केले आहे. आज त्या ‘भाकर सेवा संस्थे’च्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या हक्काच्या ‘काळजीवाहक’ बनल्या आहेत.
संघर्षाचा प्रवास
रत्नागिरी तालुक्यातील रहिवासी असलेल्या सुरभी वाडेकर यांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. हक्काच्या घरातून आणि परिवाराकडून नाकारले गेल्यावर त्यांनी ‘प्रतिभाश्रम’ गाठले. तिथून ‘सखी वन स्टॉप सेंटर’मध्ये त्यांच्या प्रकरणाची नोंद झाली. मध्यंतरीच्या काळात समुपदेशन करून त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले, मात्र काही दिवसांतच त्यांना पुन्हा घराबाहेर काढण्यात आले. या कठीण काळात त्यांनी पुन्हा सखी केंद्रात धाव घेतली आणि घरी न परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. अशा परिस्थितीत त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी सन २०२३ मध्ये त्यांना ‘भाकर सेवा संस्थे’च्या महिला पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. याच ठिकाणी त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले. एकाकीपणाच्या वातावरणात त्यांनी स्वत:ला दु:खात बुडवून न घेता कष्टाची वाट निवडली.
भाकर संस्थेत आल्यानंतर सुरभी यांनी रिकामे न बसता त्यांनी सेवा करण्याचा निर्धार केला. तेथील आजी-आजोबांचे गाव या वृद्धाश्रमातील वृद्धांची सेवा करण्याची तयारी श्रीमती वाडेकर यांनी दर्शवली. तेथील प्रत्येक आजी-आजोबा हे आपलेच आई-वडील आहेत, या भावनेतून कामाला सुरुवात केली. आज त्या या वृद्धांची मनापासून देखभाल करत आहेत. वृद्धांचे संगोपन करणे आणि त्यांना अंघोळ घालणे, वेळेवर जेवण आणि औषधोपचार पाहणे, साफसफाई करणे आणि वृद्धांना डॉक्टरांकडे नेणे या सर्व कामात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन संस्थेने त्यांची ‘काळजीवाहक’ या पदावर नियुक्ती केली असून, त्यांना कामाचा योग्य मोबदलाही सुरू केला आहे.
‘ज्यांनी नाकारले त्यांच्यासाठी रडत बसण्यापेक्षा ज्यांना आपली गरज आहे त्यांच्यासाठी जगणे म्हणजे खरं आयुष्य’ हा संदेश सुरभी वाडेकर यांच्या जीवनप्रवासातून मिळतो. कधीकाळी मदतीसाठी वणवण करणाऱ्या सुरभी आज त्याच संस्थेत एक जबाबदार घटक म्हणून कार्य करत आहेत. गरिबीची जाणीव आणि मायेचा आधार देणाऱ्या सुरभी वाडेकर यांच्या रूपाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना एक उत्तम काळजीवाहक आणि मुलगी मिळाली आहे. त्यांचे हे कार्य समाजातील पीडित महिलांसाठी एक नवी उमेद देणारे ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button