जगबुडी पुलावर अपघाताची मालिका सुरूच ,दुभाजक तोडून दोन पुलांच्या मध्ये अडकला कंटेनर


मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर रविवार दि.१२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर थेट दुभाजक तोडून दोन पुलांच्या मधोमध अडकला. या घटनेत कंटेनर अर्धवट अवस्थेत नदीकडे झुकल्याने काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कंटेनरचा वेग अधिक असल्याने तो दुभाजक तोडत पुढे सरकला आणि दोन पुलांच्या मधल्या जागेत अडकून राहिला. कंटेनरचा अर्धा भाग हवेत झुकलेला असल्याने तो थेट सुमारे २०० फूट खोल जगबुडी नदीत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र दैव बलवत्तर असल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर सुरक्षित बाहेर काढण्यात आला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले.
दरम्यान, कंटेनर बाहेर काढण्याचे काम सुरू असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक लेन सुमारे दीड तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, जगबुडी पुलावर याच आठवड्यातील हा दुसरा भीषण अपघात असून, वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे या पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांकडून या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button