जनता दरबारात १६९ अर्जांपैकी ९० टक्के जागेवर निकालीप्रलंबित अर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा- पालकमंत्री डाॕ उदय सामंत

रत्नागिरी, दि. 10 ) : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध विभागांचे 169 अर्ज आले होते, त्यापैकी जवळपास 90 टक्के आजच्या दरबारात जागेवरच निकाली निघाले.

अधिकारी सक्षमपणाने काम करत असल्याबद्दल अधिकाऱ्यांचे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी कौतुक केले. या जनता दरबारमधील प्रलंबित अर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यास्तरावर पाठपुरावा करुन त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिल्या.
आज झालेल्या जनता दरबारला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे,
जि.प.चे उपाध्यक्ष विलास चाळके, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रश्न घेऊन येणाऱ्या जनतेसाठी जिल्हा प्रशासनाने तळमजल्यावर नोंदणी कक्ष, टोकन, दुसऱ्या मजल्यावर प्रतिक्षा कक्ष अशी सुविधा केली होती. तब्बल तीन ते साडेतीन तास पालकमंत्री, अधिकारी जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बसून होते. भूसंपादन मोबदला, रस्ता डांबरीकरण, मजबुतीकरण, मुख्यमंत्री सडक योजना, खंडित वीजपुरवठा, पोल शिफ्ट, प्रधानमंत्री आवास योजना, जमिनीचे प्रश्न, बीएसएनएल टॉवर, वीज, नळपाणी, गृहनिर्माण सोसायट, माजी सैनिक संदर्भातील, नुकसान भरपाई देणे असे अनेक प्रश्न घेऊन जनता आज दरबारात आली होती. जागेवरच प्रश्नांचा निकाल लागल्याने समाधानाने ती परतत होती.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, या जनता दरबारमधील जवळपास सर्वच अर्जांचा निपटारा इथे झाला आहे. परंतु, 169 अर्जांपैकी काही प्रलंबित अर्ज आहेत, त्या अर्जाबाबत संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्यास्तरावर पाठपुरावा करुन त्याबाबतचा अहवाल सादर करावा. शेतामध्ये असलेले खांब महावितरणने तात्काळ शिफ्ट करुन द्यावेत. शेताच्या बांधावर घ्यावेत. त्यांनी खांब बदलने अथवा नवीन टाकणे यासाठी स्वत:च्या विभागातूनच निधी उपलब्ध करुन घेणे अपेक्षित आहे.

धनगरवाड्यामधील थ्री फेज, सिंगल फेज कनेक्शनबाबत काय परिस्थिती आहे त्याबाबतचा अहवाल 15 दिवसात द्यावा. तांडा वस्तीमधील निधीतून त्यावर खर्च करता येईल. महावितरणने कोणतेही काम करताना तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन करावे. गावामध्ये जे रस्ते पारंपरिक आहे, ज्याची नोंद 23 वर, 26 वर घेण्यात आलेली नाही, सर्वेक्षण करुन अशा रस्त्यांची नोंद 23 वर, 26 वर घ्यावी. एसटी बस थांब्यासाठी हॉटेल अथवा ढाबा अधिकृत असणे गरजेच आहे. ज्या ठिकाणी स्वच्छ शौचालये, महिला सुरक्षितता या सर्व बाबींचा विचार करुन एसटी बस थांबा असेल, अशा ठिकाणीच चालक/वाहक एसटी बस थांबवतील. याबाबत सर्वेक्षण करा.
दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक लावा. जिल्ह्यातील माजी सैनिकांना मान-सन्मान दिला पाहिजे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढावे. आरजीपीपीएल सुरक्षा रक्षक याबाबत मॅनेजमेंटसोबत विस्तृत बैठक घेण्यात येईल आणि त्यांचे विषय मार्गी लावण्यात येतील. झोपडपट्टीमधील सर्व कामगारांची कामगार नोंदणी करुन घ्या.
आजच्या जनता दरबारासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button