रत्नागिरीत रंगणार ७२ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा; १ आणि २ मे रोजी आयोजन


​रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर टाकणारी ७२ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या १ आणि २ मे २०२६ रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मा. नामदार श्री उदयजी सामंत प्रतिष्ठान’ आणि ‘रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा संपन्न होणार आहे.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कै. श्री. श्रीराम हरी खातू नाट्य मंदिर आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. राष्ट्रीय स्वास्थ एवं शरीरसौष्ठव महासंघ (IFBF) आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत एकूण ८ विविध श्रेणींमध्ये स्पर्धा होतील, ज्यामध्ये भारत श्री, भारत किशोर, भारत कुमार भारत उदय, भारत श्रीमान मेन फिजिक्स, क्लासिक फिजिक्स आणि जिम मॉडेल अशा श्रेणी राहणार आहेत.

या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून सुमारे २५० नामवंत शरीरसौष्ठवपटू रत्नागिरीत दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत प्रशिक्षक, पंच आणि पदाधिकारी मिळून सुमारे ३५० जणांची उपस्थिती असणार आहे. सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची आणि पंचांची निवास व भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे.

स्पर्धेत एकूण १० मुख्य ‘टायटल्स’ दिली जाणार आहेत. विजेत्यांना भव्य ट्रॉफी, मानाचा पट्टा, पदक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येईल. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या ६ क्रमांकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याशिवाय, राष्ट्रीय पंच परीक्षेचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे.

स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री ना. डॉ. उदयजी सामंत आणि राजापूरचे आमदार मा. किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण आणि समारोप सोहळा २ मे रोजी रात्री १० वाजता संपन्न होईल.

स्पर्धेचे प्रमुख म्हणून रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. विरेंद्र वणजू जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना संघटनेचे अध्यक्ष श्री. सदानंद जोशी, सेक्रेटरी जितेंद्र नाचणकर आणि सर्व पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील विविध व्यायामशाळांचे प्रमुख सहकार्य करत आहेत.
​रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी, व्यायामशाळा चालक आणि विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button